Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

yuvarashadmin

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात गरमपासून वाचण्यासाठी घरोघरी कूलर लावण्यात येतात. विदर्भात उन्हाचा पारा 44 अंशावर पोहचला असून उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतेय. अशात उन्हापासून दिलासा म्हणून विदर्भात कुलरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र अकोल्यात कुलरचा वापर एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. कुलरमधील एक तार तुटून त्यात विद्यूत प्रवाह वाहू लागला. खेळता खेळता चिमुकलीचा हात कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. दरम्यान तिला रुग्णालयात दाखल केलं असता त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. मृत मुलीचं नाव युक्ती गोगे असून ती भाजप नगरसेवक अमोल गोगे यांची मुलगी आहे. ही घटना अकोला शहरातील शिवसेना वसाहतीत असून परिसरात शोककळा पसरली आहे. 

रविवारी रात्री 9 च्या सुमारास कुलर जवळ खेळत असताना ही घटना घडली आहे. कुलरमधील एक तार तुटला आणि हा तार कुलरच्या जाळीला लागला त्यामुळे कुलरच्या जाळीत विद्युत प्रवाह वाहू लागला. खेळता खेळता या चिमुकलीचा हाथ कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. घरच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी युक्तीला दवाखान्यात दाखल केलं मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. 

कुलरचा वापर करतांना या गोष्टींची काळजी घ्या!

1 कुलरची आणि घराची वायरिंग तपासून घेणे

2 लहान मुलांचा कुलरला स्पर्श होणार नाही याची दक्षता घेणे

3 कुलरमध्ये पाणी भरतांना कुलरमधील विद्युत प्रवाह बंद करणे

4 अर्थिंग नीट तपासून घ्यावी

5 वेळोवेळी टेस्टरने कुलरमध्ये विद्युत प्रवाह बाहेरून प्रवेश झाला आहे का हे तपासणे 

आतापर्यंत जिल्ह्यात या उन्हाळ्यात कुलरचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महावितरण द्वारे सुद्धा दर उन्हाळ्यात कुलर वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. तरी मात्र थोड्याशा निष्काळजीपणामुळे नागरिकांना आपला जीव गमावा लागतोय. त्यामुळेच कुलर वापरताना सर्व काळजी घेणे खूप गरजेचे आहे. 

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a comment
scroll to top